दिग्दर्शक : पीटर बर्ग
कलाकार : विल स्मिथ, चार्लीज़ थेरॉन, जेसन बेटमन, बेटमन, एडी मॉर्सन
चि
त्रपटांमध्ये हिरो असतात. सुपरहिरो असतात. जॉन हॅनकॉक असाच वेगळ्या प्रकारचा सुपरहिरो आहे. एरवी सुपरहिरो सर्वांचाच आवडता असतो. मात्र हॅनकॉकपासून लोक वैतागले आहेत. त्याच्याबद़दल लोकांमध्ये घृणा आहे. हॅनकॉक हा पक्का दारुडा आहे आणि नशेत तर्रर्र होऊन रस्त्याच्या कडेला पडलेला असतो. कुणाशी सरळ बोलणे नाही, हवेतून तो जमिनीवर उतरतो त्यावेळी रस्त्यांत खडडे पडतात. तो कोणतेही भले काम करायला जातो तेव्हा उलटेच होते. परिणामी लोकांच्या समस्या वाढतात. लोकांच्या दृष्टीने तो बिघडलेला सुपरहिरो आहे.
सुपरहीरोचे आतापर्यंत तुम्ही अनेक चित्रपट पाहिले असतील. मात्र, बिघडलेला सुपरहिरो ही नवीन कन्सेप्ट आहे. आपल्याबददल लोकांच्या मनात घृणा का हे हॅनकॉकला जाणून घ्यायचे आहे. त्यालाही वाटते की कुणीतरी त्याच्यावर प्रेम करावे मात्र त्याचे कुणीही नाही आणि त्यामुळे त्याच्यात प्रचंड राग भरला आहे.
चित्रपटाची सुरुवातच नावीन्यपूर्ण आहे त्यामुळे लवकरच ती प्रेक्षकांचा ठाव घेते. चित्रपटात भरपूर स्पेशल इफेक्ट, स्टंट दृश्ये आणि कॉमेडीही पाहायला मिळते.
एकदा एक पीआर एक्झ्युक्युटिव्ह रे एंब्रे याला हॅनकॉक वाचवितो. या उपकाराची फेड त्याला सुधारून करायची असा रेचा प्रयत्न असतो. मग तो हॅनकॉकला सांगतो की तुला एका सुपरहिरोसारखे राहिले पाहिजे. त्याच्यासारखे वागणे, बोलणे, लोकांसोबत नम्रतापूर्वक व्यवहार आदी... आदी...
मग हा बिघडलेला सुपरहिरो योग्य रस्त्यावर यायला सुरुवात होते. रेच्या पत्नीला हॅनकॉकचे घरी येणे आणि तिच्या मुलाशी बोलणे आवडत नाही. कारण हॅनकॉकचे पूर्वायुष्य काय आहे, हे तिला पक्के माहितेय.
यथावकाश या मागचे रहस्य उलगडते मात्र फारशी मजा येत नाही. या भागात दिग्दर्शक आणि लेखकाने भावनिक दृश्य निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.
दिग्दर्शक पीटर बर्गने मात्र आपल्या कलावंतांकडून चांगला अभिनय करवून घेतला आहे. मात्र, कथेत त्यांनी घडविलेल्या रहस्यभेदामुळे मजा येत नाही. स्टंट आणि स्पेशल इफेक्ट्स उल्लेखनीय आहेत.
विल स्मिथने पूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलून नेला आहे. बिघडलेल्या आणि चिडचिड्या सुपरहिरोची भूमिका त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने वठविली आहे.
जेसन बेटमननेही दिलेली भूमिका ताकदीने साकारली आहे. जिच्या मनात एक मोठे रहस्य दडलेले आहे अशा समर्पित पत्नीची भूमिका चार्लीज़ थेरॉनने चांगली साकारली आहे. ‘हॅनकॉक’ एकदा पाहायला तशी काहीही हरकत नाही.

लोड होत आहे...