निर्देशक : अब्बास टायरवाला
संगीत : ए. आर. रहमान
कलाकार : इमरान खान, जेनेलिया, मंजरी, अयाज़ खान, करण माखीजा, सुगंधा गर्ग, निराव मेहता, अनुराधा पटेल, रत्ना पाठक-शाह
मुला-मुलीत असलेली मैत्री हा तसा नाजूक विषय. मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी होईल सांगता येत नाही. याच
आधारावर दिग्दर्शक आणि लेखक अब्बास टायरवाला यांनी 'जाने तू... या जाने ना' बनविला आहे. एखाद्या चित्रपटाची कथा मोठी नसेल तर स्क्रीन प्ले मजबूत असायला हवा. त्यातील दृश्यच इतके आकर्षक हवेत की कथा कशीही असली तरीही प्रेक्षकांना कंटाळा यायला नको. अब्बास टायरवाला यांना यात काही अंशी यश मिळाले आहे. त्याच्या कथा मांडणी आणि सादरीकरणात नाविन्य आहे.
जय सिंह राठौर (इमरान खान) फक्त नावापुरता राजपूत युवक. त्याची मैत्रीण अदिती महंत (जेनेलिया) त्याला नेहमी फट्टू म्हणते. शांत स्वभावाचा जय तर अदिती सर्वांशीच भांडणारी. त्याच्या ग्रुपमध्ये जिग्गी, शालीन, रोतलू और बॉबस हे देखिल आहेत. रोतलू अदितीवर तर बॉबस जयवर मनातल्या मनात प्रेम करतात. दोघांचे नाते खूप मजेदार आहे. दोघांना एकमेकांच्या भावना माहीत आहेत. म्हणूनच ते एकमेकांच्या खूप जवळ आहेत. जय आणि अदिती नेहमी सोबत राहणारे. त्यामुळे सर्वांनाच असे वाटते की त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे. याबाबत जय आणि अदितीला याबाबत जेव्हा अदितीचे आईवडील विचारतात. तेव्हा ते असे कुठलेही नाते नसल्याचे सांगतात. पण आपले म्हणणे कसे चुकीचे आहे, हे नंतर त्यांना कसे लक्षात येते हीच चित्रपटाची कथा आहे.
तरुण प्रेक्षकांना ध्यानात घेऊन चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे तरुणांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. चित्रपटात अनेक नव्या चेह-यांना त्यांनी संधी दिली आहे. आणि त्यांना कमीत-कमी मेकअपमध्ये पडद्यावर आणले आहे. चित्रपटाचा पहिला तास मनोरंजक आहे. आजच्या तरुणाईचे सही चित्रण त्यांनी या एका तासात केले आहे. उत्साह आणि उर्जायुक्त अशी चित्रपटाची सुरुवात झाली आहे.
दुस-या तासात चित्रपट थोडा कमकुवत होतो. अदिती आणि जयला जाणून बुजून दूर-दूर ठेवले गेले आहे. चित्रपटाचा हा भाग चांगलाच ताणला गेला आहे. क्लायमॅक्स तर टिपीकल फिल्मी वाटतो. मात्र तरीही अब्बासने ज्या पद्धतीने कथा गुंफली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. चित्रपटात अनेक नात्यांची उकल छान करण्यात आली आहे. जय आणि त्याची आई बची यांच्यातील नाते, अदिती आणि तिचा भाऊ अमित यांच्यातील नाते तर रोतलू आणि बॉबस यांच्यातील नात्याची गुंफण छान रंगविली आहे. तर नसिरूद्दीन शाह आणि रत्ना शाह यांच्यातील संवाद छान जमले आहेत. अरबाज व सोहेल खान यांच वापरही चांगला झाला आहे.
इमरान खानच्या व्यक्तिमत्त्वावर भूमिका फिट बसली आहे. इमरानकडे रफटफ लुक नाही. तर त्याच्याकडे मसल्सही नाहीत. मात्र आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात तो यशस्वी ठरला आहे.
सावळ्या रंगातल्या जेनेलियाचे बोलके डोळे आणि तिचे हास्य खूप काही सांगून जाते. जेनेलियातील अभिनयाची क्षमता पाहता दिग्दर्शकाने तिला केवळ चेह-याने अभिनय करण्याचा भरपूर वाव दिला आहे. कास्टिंग डायरेक्टर पाखी यांनी चांगल्या कलाकारांची निवड केली आहे. सर्व चेहरे नवीन असले तरीही चित्रपट पाहिल्यानंतर ते लक्षात राहतात. ए. आर. रहमान हा चित्रपटाचा आणखी एक हिरो ठरला आहे. त्याचे संगीत अतिशय उत्कृष्ट आहे.

लोड होत आहे...
प्रतिसाद