Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

आमोद-प्रमोद गणरायाचे 'पद्मालय'

महाभारताच्‍या भिष्‍मपर्वात खंडा म्‍हणून उल्‍लेख असलेल्‍या आणि तितकाच मोठा प्राचीन इतिहास असलेल्‍या खानदेशच्‍या जळगाव जिल्‍ह्यात पद्मालय येथे गणरायाच्‍या प्रवाळयुक्‍त दोन जागृत मूर्ती स्‍थापित आहेत. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशातील दुसरा फारुकी राजा मलीक याला खान ही पदवी बहाल केली होती. त्‍याच्‍या नावावरून 'खानाचा देश' म्‍हणून खानदेश असे नाव पडले.

जळगाव जिल्‍ह्यातील एरंडोल जवळ असलेल्‍या पद्मालय येथील मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्‍हणून प्रसिध्‍द आहे. येथे दर चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. 'पद्म' म्‍हणजे कमळ आणि 'आलय' म्‍हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्‍ट्य लक्षात येते. येथे वेगवेगळ्या प्रकारच्‍या कमळांमुळे असलेल्‍या पद्मालय या नावावरूनच या ठिकाणाची ओळख पटते. या संस्‍थानला माधवराव पेश्‍ावे यांची सनद मिळाली आहे.


एरंडोल पासून सुमारे 10 कि.मी.चा प्रवास करून गेल्‍यानंतर श्रीगणेशाच्‍या अडीच पीठांपैकी अर्धपीठ श्रीक्षेत्र पद्मालय मंदिराला आपण पोचतो. मंदिराच्‍या गाभा-यात आमोद व प्रमोद अशा गणरायाच्‍या दोन गणपती आहेत. डाव्या व उजव्या सोंडेचे नवसाला पावणारे हे गणपती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. दोन मूर्ती असलेले गणेशाची असे कदाचित एकमेव मंदिर असल्‍याची मान्‍यता आहे. मंदिरातील या मूर्ती एक सहस्त्रअर्जुनाने आणि दुसरी श्रीशेषाने स्थापन केल्‍याचा उल्‍लेख श्रीगणेश पुराणातील उपासना खंडात आढळतो. या मूर्तींना श्रीप्रवाळ गणेश म्हणतात. मंदिराच्‍या समोरील कमळाच्‍या तळ्यातून भाविकांना दर्शन देण्‍यासाठी या मूर्ती वर आल्‍याचा भक्‍तांचा समज आहे.

अतिशय जून्‍या दगडातून बांधलेल्‍या या गणेश मंदिराचे बांधकाम प्राचीन असून ते कुणी बांधले याबाबतची माहिती आता अस्तित्‍वात नाही. मात्र ते सुमारे 1200 वर्षांपूर्वीचे असल्‍याचे येथील रहिवासी सांगतात. सुमारे 35 फूट उंच भिंती एका अखंड पाषाणातून उभारण्‍यात आल्‍या आहेत. तर कळसावर तसाच अवजड प्रचंड घुमट आहे. मंदिराच्‍या परिसरातील इतर वास्‍तूंचे बांधकामही काळ्या पाषाणातूनच केलेले आहे. तर मंदिरापासून खालील तळ्यापर्यंत याच दगडाच्‍या पाय-या करण्‍यात आल्‍या आहेत.

मंदिराच्‍या बाहेर मुख्‍य प्रवेशव्‍दाराजवळ सुमारे सव्‍वा तीन फूट व्‍यासाचे अवाढव्‍य दगडी जाते आहे. पूर्वीच्‍या काळी धान्‍य दळण्‍यासाठी अशाप्रकारच्‍या लहान जात्‍यांचा वापर घराघरात होत असते. मात्र येथे असलेल्‍या जात्‍यास 'भिमाचे जाते' म्‍हणून संबोधले जाते. हे जाते इतके अवाढव्‍य आहे, की सात-आठ सशक्‍त माणसांनी प्रयत्‍न करूनही ते हलविणे शक्‍य होत नाही.

मंदिरात सुमारे 11 मण वजनाचा (440 किलो) पंचधातूचा अवाढव्‍य घंटा आहे. पद्मालयापासून 2 कि.मी. अंतरावर भीमकुंड आहे. येथे भीमाने बकासुराचा वध केल्‍याची आख्‍यायिका आहे. मंदिरात दरवर्षी कार्तिक पोर्णिमा, अंगारिका आणि संकष्‍टी चतुर्थीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते.

कसे जालः पद्मालय येथे जाण्‍यासाठी जवळचे ठिकाण एरंडोल हे आहे. एरंडोल हे गाव धुळे व जळगाव या रस्‍त्‍यावर (सूरत-नागपूर महामार्गावर) आहे. एरंडोलपासून पद्मालयाला जाण्‍यासाठी दर तासांनी गाडी असते. तर जळगावहून सकाळी सात, नऊ आणि दुपारी 3 वाजता बसची सोय करण्‍यात आली आहे.

जवळचे रेल्‍वे स्‍थानकः जळगाव.
नकार